Saturday, 5 August 2017
निकेत पावसकर यांचा कणकवली पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण पत्रकार पुरस्काराने गौरव
कणकवली : प्रतिनिधी
समाजाच्या विविध घटकांमध्ये समाजासाठी आदर्शवत काम करणारे अनेकजण असतात, पण ते दुर्लक्षित असतात त्यांना शोधुन काढून त्यांचे कौतुक करणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, त्यांना प्रकाशित करणे हे समाज विकासाठी प्रेरणादायी आहे. पत्रकारच हे काम करु शकतात, म्हणून कणकवली तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेला समाजातील विविध मान्यवरांचा गौरव सोहळा हा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ व प.पू भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी काढले.
याप्रसंगी दै. लोकमत वार्ता संकलक निकेत पावसकर यांचा ग्रामीण पत्रकार पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला.
कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षिस वितरण आणि पत्रकार तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा गुरूवारी कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश कामत होते. यावेळी कणकवलीच्या नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड, सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, कणकवलीच्या तहसिलदार वैशाली माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शशीकांत खोत, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायगंणकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, गझलकार मधुसुदन नानिवडेकर, कवी अजय कांडर, कणकवली रोटरी क्लबचे अध्यक्ष दादा कुडतरकर, प्रा.महेंद्र नाटेकर, तालुका पत्रकार संघाचे सचिव मोहन पडवळ आदी उपस्थित होते.
सुरेश कामत व मान्यवरांच्या हस्ते कासरल गावचे प्रगतशील शेतकरी रामचंद्र सावंत, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुहास वरूणकर, ज्येष्ठ संपादक प्रा. मुकुंदराव कदम, ज्येष्ठ पत्रकार सदा वराडकर, पत्रकार लक्ष्मीकांत भावे, निकेत पावसकर, छायाचित्रकार पप्पू निमणकर यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ देवून तर निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
सभापती सौ.भाग्यलक्ष्मी साटम म्हणाल्या, पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो. आजच्या सोशल मिडिया व फास्ट जमान्यातही पत्रकार आणि वृत्तपत्रांचे महत्व अनन्यसाधारण आहे. पत्रकार हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. कणकवली तालुका पत्रकार संघाचे विविध उपक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. तर जीवाची पर्वा न करता समाजाला चांगल्या गोष्टी देण्याचा पत्रकार नेहमी प्रयत्न करतो. समाजाचे आपण देणे लागतो या जाणिवेतून सामाजीक कार्य करणार्यांचा गौरव करण्याचे पत्रकार संघाने केलेले काम प्रेरणादायी आहे, अशा शब्दात नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी पत्रकार संघाला शुभेच्छा दिल्या.
कणकवलीच्या तहसिलदार वैशाली माने म्हणाल्या, पत्रकारांमुळे समाजाच्या विविध घटकांवर नियंत्रण राहते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, गणेश जेठे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, अशोक करंबेळकर, दादा कुडतरकर यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत यांनी सामाजिक भान जोपासत कणकवली तालुका पत्रकारसंघाने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्यांचा गौरव केल्याचे सांगून याही पुढे समाजहिताचे विविध उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही दिली. पत्रकार हा समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्या निवारण्यासाठी सतत पाठपुरावा करतो. यावेळी निबंध स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख दत्तात्रय मारकड व परीक्षकांचाही सत्कार करण्यात आाल. सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी तर आभार मोहन पडवळ यांनी मानले.
No comments :
Post a Comment