Friday, 24 February 2017
मुरगुड मध्ये भीषण अग्निकांड कोळेकर दाम्पत्याचा अंत- तीन दुकाने भस्मसात 55 लाखाचे नुकसान
मुरगुड प्रतिनिधी -समीर कटके
मुरगुड ता कागल नवी पेठ येथील राजीव गांधी चौकातील कोळेकर होजीअर्स या दुकानास मध्यरात्री
एकच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दुकान मालक धनंजय गजानन कोळेकर
वय 40
व त्यांच्या पत्नी सौ प्रियांका धनंजय कोळेकर वय 32 यांचा मृत्यू झाला.
आगीच्या
भडक्यात शेजारील विजय सायकल व आर के टेलरिंग स्पेअरपार्ट्स ही दोन्ही दुकाने जळून खाक
झाल्याने एकूण अंदाजे 55 लाखाचे नुकसान झाले. घटनेची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कोळेकर
यांच्या माजघरात वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटने आग लागली. याच खोलीत झोपलेले धनंजय व
प्रियांका जागे झाले. धनंजय यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात येत नाही हे
लक्षात आल्यानंतर त्यांनी खाली येऊन वडील गजानन, आई सुलोचना कोळेकर, मुले रोहित व ज्ञानेश्वरी
यांना घराबाहेर काढले व सुरक्षित ठिकाणी आणले. या दरम्यान पत्नी प्रियांका आग विझवण्याचा प्रयत्न
करत असताना त्यांच्या अंगावर पेटलेली तुळई व छत कोसळल्यामुळे त्या गंभीर अवस्थेत वरच्या
मजल्यावर अडकल्या त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना धनंजय यांच्या अंगावर पेटते छत पडले यात
धनंजय व प्रियांका या दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती कोळेकर दाम्पत्याचा मुलगा रोहित याने
दिली.
दरम्यान नव्या पेठेतील नागरिक तरुणानी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. तत्परता दाखवून बिद्री
साखर, हमीदवाडा साखर कारखाना व कागल नगर परिषदेच्या अग्निशमन विभागांना फोन केले.एकावेळी
तीन अग्निशमन बंबा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.30 फूट उंच आगीच्या लोळानी
भीतीचे वातावरण पसरले होते.
दुकानाच्या वरच्या माळ्यावरील लाकडी साहित्य, दुकानातील कपडे, जुन्या पद्धतीच्या घरातील अन्य
लाकूड साहित्य यांनी पेट घेतल्यामुळे आगीचा डोंब नियंत्रणा पलीकडे गेला.वरचा मजला कोसळून खाली
पडला.पण त्यापूर्वी धनंजय व प्रियांका यांचा अकरावीत शिकणारा मुलगा रोहित याने आपले मम्मी ;पपा
वरील मजल्यावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत याची माहिती असतानाही कमालीचे धाडस,
समयसूचकता दाखवून स्वयंपाक घरात असणारी तीन गॅस सिलेंडर्स घराबाहेर आणली. त्यामुळे संभाव्य
महाभयानक आपत्ती टळली.
पण तोपर्यंत अग्नीने आपले भयानक रूप दाखवले होते. दुर्घटनेत कोळेकर कुटुंबियांचे कपड्याचे दुकान,
घर, साहित्य असे पंन्नास लाखाचे नुकसान झाले. तर त्यांच्या शेजारी असणारे महादेव मडीलगेकर यांचे
विजय सायकल हे दुकानही जळून खाक झाले यात सायकल्स, मोपेड, सायकलचे स्पेअर पार्टस असा 3
लाखाचा माल भस्मसात झाला. त्याच्या शेजारील कृष्णात रानमाळे यांचे शिलाई मशीन्स व स्पेअरपार्ट्स
विक्रीचे आर.के. टेलरिंग व स्पेअरपार्ट्सचे विक्रीचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले व दोन लाख
रुपयांचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नांनी व 6 बंबाच्या सहाय्याने
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
भीषण दुर्घटनेत आई वडिलांचे छत्र हरवल्यामुळे रोहित व ज्ञानेश्वरी अनाथ झाली आहेत.आजोबा
गजानन कोळेकर वार्धक्याने अंथरुणास खिळून आहेत.त्यामुळे दोन मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा
राहिला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment