Saturday, 11 February 2017
‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ असा मजकूर लिहिलेल्या टी शर्ट विक्रेत्याला कानडी पोलिसांकडून आकसाने अटक
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सर्वत्र क्रांती मोर्चे काढण्यात आले. कर्नाटकाच्या ताब्यात असलेल्या बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह ८६५ मराठी भाषिक गावांत लाखो मराठी बांधव असल्याने येथेही मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात येऊ लागले आहेत. यामध्ये सीमालढा चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगाव येथेही मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासह सीमाप्रश्न मागणीचा यामध्ये समावेश केल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीसह सीमाभागातील सर्व मराठी जनता या मोर्चासाठी एकवटली आहे. कर्नाटक सरकारलाही या मोर्चासाठी परवानगी द्यावी लागली आहे.
मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.विविध कारणाने मराठी भाषिकांची गळचेपी करणारे प्रशासन मराठा क्रांती मोर्चासाठी लागणारे साहित्य विकणाऱया विक्रेत्यांवर दादागिरी करत असून शुक्रवारी ‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ असे लिहिलेले टी-शर्ट विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आले. तसेच कोल्हापूर येथून टी-शर्ट विक्रीसाठी आलेल्या शहाजी भोसले या युवकाला खडेबाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकल मराठा समाजाच्या संयोजकांनी पोलिस स्थानकात पोलिसांची भेट घेतली. सदर तरुणाची सुटका करण्याची विनंती केली.या टी-शर्टवरील मजकूर वादग्रस्त असल्याने ही कारवाई केल्याचे कानडी पोलिसांकडून कारण पुढे करण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती तर कानडी पोलिसांकडून मराठीद्वेष आणि आकसातून ही कारवाई करण्यात आली आहे .शहाजी भोसले याला 153 ए कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.
सुरुवातीपासूनच मोर्चाला परवानगी देण्यापासून ते इतर ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. टी-शर्ट व भगवे ध्वज विकणाऱयांवर कारवाई होत असल्याने मराठी भाषिकांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार शहरवासियांमधून व्यक्त होत आहे.
अशा कारवाईला भीक घालत नसल्याची कडक प्रतिक्रिया सीमाभागातून उमटत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment