Powered by Blogger.

Friday, 17 March 2017

भडगाव गायरान जमिनीवर अतिक्रमण मोजणी प्रक्रिया सुरु

No comments :

प्रतिनिधी - समीर कटके

भडगाव ता कागल येथील गायरान जमिनीवर ग्रामस्थानीच अतिक्रमण केले असल्याचा आरोप
ग्रामस्थांकडूनच गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. भडगाव मधील साडे सहा एकर गायरान
क्षेत्रावर अतिक्रमण झाले असल्याच्या ग्रामस्थ, संघटना व राजकीय पक्षांकडून तक्रारी होत होत्या.
ग्रामसभा व राजकीय सामाजिक क्षेत्रात हा वादाचा विषय ठरला होता. गायरान क्षेत्र मोजून हद्द
निश्चित करावी व जर अतिक्रमण असल्यास ते हटवावे अशी मागणी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती.
ग्रामपंचायतीने या बाबत ठोस भूमिका घ्यावी असा दबाव निर्माण झाला होता. अखेर भूमापन
अधिकाऱ्यांनी मोजणी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील घर व जमीनधारकाना आपला
मालकी हक्क सिद्ध करावा लागणार आहे त्यामुळे गावात अनेक कुटुंबाना तणाव व चिंता यांना सामोरे
जावे लागत आहे.

             गट क्र115, 97 व 27 हे साडे सहा एकर गायरान क्षेत्र आहे. जि प शाळा ते निढोरी कागल
रस्त्यावरील भडगाव फाट्यापर्यंत हे क्षेत्र विस्तारले आहे. या भागातील अतिक्रमण काढावे यासाठी
शिवसेना, लाल बावटा यांच्या कडून वारंवार ग्राम पंचायत व तहसीलदार यांच्याकडे तक्रारी निवेदने
दिली होती. गाव पातळीवर हा मुद्दा वादाचा झाला होता. जुन्या जाणत्या लोकांकडून अतिक्रमणे
काढावीत यासाठी विनंत्या केल्या जात होत्या. शेवटी गत वर्षी डिसेंबर महिन्यात ग्राम पंचायतीने
भूमापन कार्यालयाकडे क्षेत्र मोजणीची मागणी केली.त्यानुसार मोजणी सुरु झाली आहे. कागल भूमापन
विभागाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. परीक्षण भूमापन अधिकारी श्रीकांत चव्हाण
मोजणीचे काम करत आहेत.यावेळी सरपंच सुनीता देवदत्त खतकर, उपसरपंच महादेव कांबळे, सदस्य
दिग्विजय पाटील, मधुकर पाटील, धोंडीराम भांडवले, सुनील खतकर, राजेन्द्र माने, दिलीप निवृत्ती
चौगले, शशिकांत सुतार यांच्यासह कॉ .विक्रम खतकर,पोलीस पाटील उत्तम भारमल, तलाठी आर टी
पाटील, कोतवाल युवराज पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

.      भूमापन अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार मोजणी सुरु केली   असून अतिक्रमण झाले किंवा नाही हे मोजणी पूर्ण झाल्यावर स्पष्ट होईल असे सांगितले. तर सरपंच सौ
सुनीता देवदत्त खतकर म्हणाल्या मोजणीत गायरान हद्द निश्चित झाल्यानंतर कोणी अतिक्रमण केले
असल्यास ते काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.

No comments :

Post a Comment