Sunday, 26 March 2017
ज्ञानेश्वरीच्या भविष्यासाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून जमवले दहा हजार
मुरगुड प्रतिनिध - समीर कटके
मुरगुड ता कागल येथील अग्निकांडाच्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या धनंजय व प्रियांका
कोळेकर यांची इयत्ता चौथीत शिकणारी मुलगी ज्ञानेश्वरीच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी तिच्या
शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून दहा हजार
रुपयांची रक्कम जमवली. बालगोपालानी ही रक्कम तिच्या विवाहासाठी उपयोगी यावी या उद्देशाने सर
पिराजी शिक्षक पत संस्थेत सुरक्षा ठेव ठेवली आहे.
मुरगुड नवीपेठ येथील राजीव गांधी चौकातील कोळेकर कापड दुकानास आग लागून कोळेकर
कुटुंबातील धनंजय व प्रियांका या दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला होता. दुर्घटनेत घराचा आधारच
गेल्याने त्यांची दोन मुले बारावीत शिकणारा रोहित व चौथीत शिकणारी ज्ञानेश्वरी यांच्या भवितव्याचा
प्रश्न उभा राहिला. आजी आजोबा वृद्ध आहेत. आजोबा वार्धक्य व पॅरॅलीसीसने अंथरुणास खिळले
आहेत.नागरिक, संस्था, मंडळे, राजकीय नेते आदींनी पुढाकार घेऊन या कुटुंबास आधार दिला. मदतीचा
ओघ सुरु झाला. मुरगुड येथील कन्या विद्यामंदिर या जिल्हा परिषदेच्या शाळेतील ज्ञानेश्वरीच्या
बालमित्र-मैत्रिणींनी आपला खारीचा वाटा उचलला. ज्ञानेश्वरीच्या सदोदित हसऱ्या चेहऱ्यावरील लोपलेल्या
हास्याचे महत्व या चिमुकल्यानी जाणले. संवेदनशील बालमनानी आपल्या खाऊच्या पैशातून दहा
हजाराचा निधी उभा केला. त्यांना शिक्षकांनी प्रोत्साहन दिले.धीरगंभीर वातावरणात झालेल्या छोटया
कार्यक्रमात हा निधी ज्ञानेश्वरीकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी रोहित उपस्थित होता. नगरसेवक विशाल
सूर्यवंशी, बबन बारदेसकर, भिकाजी कांबळे, राजू चव्हाण यांच्यासह चंद्रशेखर जोशी, अनिल बोटे, सुरेखा
रामशे, संभाजी खामकर, शिवाजी कुंभार, दमयंती गिरीबुवा उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment