Saturday, 18 March 2017
पोलिस उपअधीक्षक परीक्षेत अमोल ठाकूर राज्यात प्रथम
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत गारगोटीच्या अमोल
नारायण ठाकूर यांनी राज्यात तिसरा तर पोलिस उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक
पटकावला. अमोल ठाकूर यांनी ५२१ गुण मिळविले. यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत अमोल ठाकूर यांनी यश मिळविल्यामुळे
त्यांची रेल्वे उपायुक्तपदी निवड झाली. सध्या ते केरळ राज्यात रेल्वे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
श्री.ठाकूर यांचे मुळ गाव बारवे (ता.भुदरगड) असून त्यांचे वडील नारायण (बंडा) ठाकूर हे बारवे
गावचे माजी सरपंच असून सध्या गारगोटीतील प्रथितयश व्यापारी आहेत. अमोल ठाकूर यांचे प्राथमिक
शिक्षण भुदरगड शिक्षण संस्थेच्या नूतन मराठी शाळेत, माध्यमिक शिक्षण गारगोटी हायस्कूल व
श्री.समर्थ ज्युनि.कॉलेज येथे तर महाविद्यालयीन शिक्षण एम.आय.टी कॉलेज, पुणे येथे झाले. त्यांनी
दहावीच्या परीक्षेत ८९ टक्के गुण मिळविले होते.
या परीक्षेतील यशानंतर बोलताना अमोल ठाकूर म्हणाले, सध्या केंद्र शासनाच्या
अखत्यारीखालील रेल्वे उपायुक्त म्हणून सेवा बजावत आहे. तरीही राज्यात तसेच पोलिस खात्यात काम
करण्याची पहिल्यापासून इच्छा असल्याने पोलिस उपअधीक्षक पद मिळाल्याचा आनंद आहे.
प्रामाणिकपणे अभ्यास केल्याचे फळ मिळाले. पदाला न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करीन.
अमोल ठाकूर यांच्या यशानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह मित्र, चाहत्यांनी गारगोटीत फटाक्यांची
आतषबाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment