Wednesday, 22 March 2017
अतिरिक्त समृद्धीने नात्यात दुरावा निर्माण झाला - डॉ.लवटे दलितमित्र बी.डी.कांबळे यांचे कार्य प्रेरणादायी
गारगोटी प्रतिनिधी
अतिरिक्त समृद्धीने नात्यात बदल होत गेले असून नात्यातला गोडवा, आपलेपणा कमी होत आहे. नात्यांत ओलाव्यापेक्षा प्रेक्षकीकरण जास्त झाले आहे. विकसित झालेल्या देशांनी मोठ्या नव्हे छोट्या छोट्या गोष्ठीतून बदल घडविला, असे उदगार जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी काढले.दलितमित्र बी.डी.कांबळे यांनी आपल्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न प्रेरणादायक असल्याचे सांगितले.
येथील श्री.शाहू वाचनालय, गारगोटी दलितमित्र बी.डी.कांबळे फौंडेशनच्या वतीने दलितमित्र बी.डी.कांबळे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित समारंभात डॉ.सुनिलकुमार लवटे 'आजचे समाजजीवन : एक चिंतन' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.एन.कारखानीस होते..
डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, संपर्क क्रांतीने मोठे परिवर्तन होत असून परिर्वतनाला प्रकाशाचा वेग आला आहे. खेड आणि शहर यातील अंतर हळूहळू पुसट व्हायला लागलेले असून खेड आणि शहरात लोकसंख्या वगळता इतर बाबीत खूपच एकरूपता दिसते. शहरापेक्षा खेडी सजग आहेत. गेल्या पन्नास वर्षात अनेक बदल झाले. अनेक उपयुक्त गोष्ठी निघून गेल्या. आपल्या घरातलं उखळ, चुल, जातं निघून गेल आहे.
सुजाणांचे शोषण करणारी व्यवस्था वाढते आहे. शिक्षणाने प्रगल्भ झालो का ? याचा विचार करावा. पोलीस व शिक्षकाला पगार जास्त हवाच. शिक्षक समाज घडवितो म्हणून आणि पोलीस समाज बिघडविण्यापासून वाचवतो.
नोकरदारांबरोबरच शेतकऱ्यांकडील अतिरिक्त पैशाच काय झालं ? याचा विचार व्हायला हवा. पूर्वी व्यक्तीगत सावकारी होती आता सहकारी सावकारी आली. व्यक्तीगत व सहकारी सावकारीचे व्याज सारखेच आहे. यामुळे शेतकरी कर्जमुक्त होणारच नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर गांभीर्याने विचार व्हावा. सामाजिक भानाला स्वत्वाच्या परिघापलिकडे जाऊन बघायला हवे.
आपल्या देशात भाषिक प्रांतरचना निर्माण केली पण आपण अधिक भाषिक झालो. देश तुकड्या तुकड्यांनी स्वतंत्र होण्याच्या मार्गावर आहे. व्यवस्थेनं आपली मन कशाकशात गुंतवली आहेत ते पाहण्याची गरज आहे. आपला दिवसातील पाच ते सहा तास वेळ केवळ पाहण्यात जातो. माध्यमेच समाजजीवनात क्रांती घडवू शकतात. फक्त त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडल्या पाहिजेत.
यावेळी श्री.मौनी विद्यापीठाचे माजी चेअरमन मधुकर देसाई, संचालक डॉ.जयंत कळके, विश्वास सुतार, भुदरगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी.एस.ठाकूर, नाथाजी पाटील, दत्ता मोरे, भाई आनंदराव आबिटकर, सरपंच रुपाली राऊत, डॉ.विजय निंबाळकर, प्राचार्य डॉ.आर.एस.कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक फौंडेशनचे अध्यक्ष व्ही.जे.कदम यांनी, पाहूण्यांची ओळख गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी, आभार मिलिंद पांगिरेकर यांनी तर सुत्रसंचलन टी.बी.पाटील यांनी केले.
फोटो : दलितमित्र बी.डी.कांबळे फौंडेशनच्या समारंभात बोलताना प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, सोबत आर.एन.कारखानीस, व्ही.जे.कदम आदी
No comments :
Post a Comment