Friday, 10 March 2017
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बोळावी येथे विविध कार्यक्रम संपन्न
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
हिमोग्लोबिन अभावी स्त्री व पर्यायाने भारतीय बालपण धोक्यात आले आहे. संपूर्ण पौष्टिक आहार
मुलींचा अधिकार व तो पुरवणे ही कुटुंबाची जबाबदारी आहे. जिभेचे चोचले पुरवणाऱ्या खाद्यपदार्थांपेक्षा
शरीराला जीवनसत्त्वे देणाऱ्या गोष्टींचा समावेश महिलांनी आहारात करावा. त्यामुळे आपले कुटुंब सदृढ
राहील, असे मत सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली पाटील यांनी व्यक्त केले. त्या बोळावी (ता. कागल)
येथील विद्यामंदिरात जागतिक महिला दिनानिमित्त बोलत होत्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित रांगोळी व पाककला स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख शा.
ना. पाटील यांच्या हस्ते पार पडले. सरपंच सुमनताई साळोखे अध्यक्षस्थानी होत्या. सुमारे ११०
महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून न्याहरी, रात्रीचे जेवण आणि मुलांच्या डब्यात द्यावयाच्या
पाककृतींचा समावेश करून त्याची आकर्षकरित्या मांडणी केली होती. .
यामध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थातील पौष्टिकता,परिसरातील उपलब्ध खाद्यपदार्थ, साधे-सोपे चटकन
होणारे पदार्थ यांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती
तोरसे, मुख्याध्यापक टी.एस.गडकरी, पालक प्रतिनिधी नम्रता सुरेश पाटील, कुस्ती पंच बटू जाधव,
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व शिक्षक तसेच बोळावी व बोळावीवाडी येथील शेकडो महिला
उपस्थित होत्या.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment