Friday, 17 March 2017
साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाच्या पाठोपाठ मरगुड व परिसरातील तरुणाईने साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने
रंगपंचमी साजरी करून नवयुवकांच्या बदलत्या मनोभूमिकेची साक्षच दिली. एरव्ही दिसणाऱ्या हिडीस
प्रदर्शनाचा यावर्षी मागमूसही नव्हता. समाज संपर्क साधने, मिडीया व मराठा क्रांती मोर्चा यामुळे
नवतरुणांच्या आशा आकांक्षा, एन्जॉयमेन्ट संकल्पना बदलत चालल्याचे सकारात्मक दृश्य या निमित्ताने
पुढे आले. तसेच योग्य दिशा मिळाली तर युवक बदल स्वीकारण्यास तयार असतात हे सुद्धा वारंवार
दिसून आले आहे.
मुरगुड व परिसरात रंगपंचमी म्हणजे रंगाशिवाय इतर हानिकारक पदार्थ काजळी, इंजिन ऑइल, पेंट,
ग्रीस, छापखान्यातील शाई यांचा सर्रास वापर भरीत भर म्हणून चौका चौकात ठेवलेली बॅरल, काहिली
यामध्ये टाकलेला चिखल कचरा यांचा वापर करून केलेले घाण पाणी एकमेकांच्या अंगावर मारले
जायचे. पाण्याचा प्रचंड अपव्यय ठरलेला असायचा. त्याबरोबरच एकमेकांचे टी शर्टस, बनियन, शर्टस,
फाडून भरवस्तीत वीज वितरण तारांवर फेकून लोंबत सोडण्याची हिडीस फॅशन रूढ झाली होती. सोबत
दारू, डॉल्बी, आक्षेपार्ह नृत्त्य, अपशब्दांचा वापर हेही ठरलेले. पण यावर्षी चित्र वेगळे दिसून आले.
पारंपरिक उत्साह, केवळ नैसर्गिक व साध्या रंगांची उधळण, पाण्याचा शून्य वापर, डॉल्बी हिडीस नृत्य
यांना फाटा यामुळे यावर्षीची रंगपंचमी स्मरणीय ठरली.
तरुणाई बदलत आहे, त्यांच्या प्रवृत्ती व व्यक्त होण्याच्या पद्धती बदलत आहेत. मराठी क्रांती
मोर्चाच्या निमित्ताने झालेली वैचारिक घुसळण, समाज संपर्क माध्यमांचा प्रबोधनासाठी झालेला वापर
यांचाच हा परिमाण आहे. हा सकारात्मक बदल डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुढे आला होता.
शाहू साखरचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी डॉल्बी मुक्तीसाठी आवाहन केले, त्यापाठोपाठ सर्वच
राजकीय गटांनी डॉल्बीमुक्तीचा आग्रह धरला होता त्यामुळे तालुक्यात या उपक्रमास अभूतपूर्व यश
मिळाले होते.जर योग्य मार्गदर्शन असेल तर तरुणाई बदल सहज स्विकारते हे सिद्ध झाले. त्यामुळे
तरुणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने राजकीय नेतृत्व, शाळा, महाविद्यालय व पालकांची
जबाबदारी वाढली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment