Wednesday, 26 April 2017
सुट्टीत मौजमस्ती बरोबरच सुरक्षितता महत्वाची
सुधाकर निर्मळे/ हेरले
प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील विदयार्थ्याच्या परीक्षा संपल्याने त्यांना उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. मुलांना मौजमजा करण्यासाठी ही सुट्टी असली तरी पालकांनी मुलांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर मुलांच्या आतताईपणामुळे विविध प्रकारचे अपघात होऊन सुट्टीवर विरजन पडण्याच्या घटना घडतात आणि पालकांवर चिंतेची वेळ येऊ शकते.
पहिली ते बारावी इयत्तेतील मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीची मौजमजा करणेसाठी बालचमू व युवावर्ग विविध खेळात दंग असलेले दिसतात. शरिर कणखर बलवान बणविण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुले क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, आदी सांघिक खेळ खेळून आनंद लुटत असतात. मात्र काही वेळेस एकमेकावरील जुना राग या सांघिक खेळाच्या वेळी काढला जातो. त्यातून मोठे वाद भांडणे होतात. खेळतांना ढकलाढकली होऊन गंभीर दुखापती होतात. असे अनर्थ घडू नयेत यासाठी पालकांनी सतर्क राहणे महत्त्वपूर्ण ठरत आहे.
रानावनात रानमेवा या महिन्यात बहरलेला असतो. आंबे, जांभळे, करवंद, या फळांचा आस्वाद घेणेसाठी मुले उन्हात रानावनात फिरत असतात. आंबा, जांभूळ झाडांवर चढून फळे काढ़ण्याची घाईगडबड करतात. मात्र या झाडांच्या फांदया मोडून खाली पडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या अपघाताने हात ,पाय मोडून डोक्याला मारहाण होऊन कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते. यातून पालकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. म्हणून पालकांनी मुलांवर लक्ष ठेवून अशा घटना घडू नये यासाठी सतर्क राहावे.
सध्या रणरणत्या उन्हामुळे काहिली होत आहे. म्हणून मुले नदया,विहिरी, तलाव, कालवे या जलाशयात उष्म्यापासून बचाव व्हावा यासाठी पोहण्यास जातात. काही वेळा घरी न सांगता पोहता न येणारे व नवशिके पोहण्यासाठी मित्रांच्या सोबत गेलेले असतात. पोहत्याली मुले पाहून त्यांना मोह आवरत नाही किंवा त्यांना पोहणारी मुले आग्रह करून चेतावत असतात. अशा वेळी तेही पोहण्यास उतरतात आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याची शक्यता असते. यावेळी नवशिके व पोहता न येणाऱ्या मुलांना समवयस्क पोहणाऱ्या मुलांपैकी आपण बुडण्याची शक्यतेच्या भितीने कोणी वाचवण्याचे धाडस करीत नाही. त्यामुळे मोठा अनर्थ घडतो. असे अनर्थ घडू नये यासाठी पालकांनी नवशिके व नपोहता येणाऱ्या मुलांना त्यांच्या मित्रांबरोबर पाठवू नये. मुलांना पोहण्यास शिकविण्यासाठी स्वतः बरोबर घेऊन जाऊन सुरक्षित स्विमिंग जॅकिटचा वापर करून शिकवावे.
मुलांना दोन चाकी चारचाकी वाहने या सुट्टी च्या काळात शिकविली जातात. मात्र आठरा वर्षपुर्ण असलेल्या मुलांनाच वाहने चालवयास शिकवावे. त्यामुळे त्यांना वाहनचालक परवाना मिळेल. त्याचा गाडीचा प्रवास योग्य ठरेल. अल्पवयीन मुलांना चारचाकी,दुचाकी वाहने शिकविल्यास ते बेभान होऊन वाहने चालवतात. यातून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना व धडक बसणाऱ्यास दोघांनाही इजा होऊन अनर्थ घडतात. काही वेळेला मृत्यू किंवा गंभीर दुखापत होते. या घटनेचा परिणाम दोन्ही कुटुंबारही होतो. त्यामुळे पालकांनी अल्पवयींन मुलांना गाडी चालवणे शिकविण्याचा मोह टाळावा. नुकताच अपघात कायदा झाला आहे. अल्पवयीन मुलाने अपघात केल्यास पालकास जबाबदार धरून त्यांना शिक्षा व दंड व्हावा अशी तरतूद केली आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांना गाडया चालविण्यास शिकवू नये.
मुलांनी या सुट्टीचा आनंद अनर्थ होऊ न देता लुटावा. दहावी, बारावी वर्गात जाणाऱ्या मुलांनी पाठयक्रम पुस्तके घेऊन वाचावीत आणि प्रकरणावाईज नोट्स काढण्यावर भर दयावा. दहावी परीक्षा दिलेल्या मुलांनी संगणक प्रशिक्षण कोर्स करून संगणक ज्ञान प्राप्त करून घ्यावे. फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, आदी सांघिक खेळांचे तंत्र शुद्ध शिबीरांमध्ये सहभाग घेऊन या खेळांचे तंत्रशुद्ध ज्ञान घेऊन स्टार खेळाडू होणेसाठी प्रयत्नशील राहावे.जलतरण शिकण्यासाठी थोरामोठ्या बरोबर जाणे अथवा जलतरण शिबीरामध्ये सहभाग होऊन पोहण्यास शिकावे. रानावनांत भटकंती योग्य रितीने करून रानमेव्याचा आस्वाद मनमुराद लुटावा. महापुरुषांची आत्मचरित्र वाचून त्यांच्या जीवनतील प्रसंग अनुभवून अष्टपैलू व्यक्तिमत्व बनविण्यासाठी वाचन वाढवावे.
No comments :
Post a Comment