Powered by Blogger.

Monday, 29 May 2017

इथे घडते सुसंस्कारित नवी पिढी - कासारवाडीत शिंदे पिता पुत्राचा समाजाला दिशा देणारा उपक्रम

No comments :


प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
मोबाईलच्या या आधुनिक काळात मे महिन्याची सुट्टी म्हणजे मुलांना सतत मोबाईलवर गेम खेळणे ,दिवसभर टीव्हीवर कार्टून पाहणे ,मामाच्या गावाला जाणे , क्रिकेट खेळणे,पोहणे यापेक्षा वेगळी कल्पना शक्यच नाही पण कासारवाडी येथे या सुटीच्या कल्पनेला छेद देणारा उपक्रम सुरु आहे.लहान वयातच मुलांना जर सुसंस्कार घडले तरच पुढील पिढी संस्कारित व जबाबदार नागरिक म्हणून उदयास येईल या उदात्त हेतूने कासारवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील हायवे लगतच्या गावात एक यशस्वी शिबीर पूर्ण महिनाभर सुरु आहे .हल्ली मुलांना अध्यात्म , वारकरी सांप्रदाय याची अजिबात माहिती नाही अश्या परिस्थितीत  तर भावी पिढीतील नवीन वारकरी,कीर्तनकार ,प्रवचनकार घडवण्याचे कार्यच येथे होत आहे .
                                   कासारवाडीचे वारकरी भिकाजी शिंदे व त्यांचे सुपुत्र भागवत हे नेहमीच वारकरी सम्प्रदायाच्या सर्व कार्यात संपूर्ण जिल्हाभर अग्रभागी असतात तसेच महालक्ष्मी दिंडी क्रमांक ५ चे संचालन करीत असतात  ,त्यांना लक्षात आले कि भावी पिढी व तरुणांचा अध्यात्माकडे ओढा कमी असून समाजात चंगळवाद फोफावत आहे , म्हणून भावी लहान मुलांना मे महिन्याच्या सुटीत वारकरी सांप्रदाय व संस्कार यांचे प्रशिक्षण मोफत देण्याचा निर्धार त्यांनी केला ,यासाठी त्यांनी कासारवाडी ग्रामस्थ व जिल्ह्यातील इतर वारकरी संस्थांना बैठकीसाठी बोलावले व आपला मनोदय बोलून दाखवला .या उपक्रमाला सर्वानी पाठिंबा देत गावातील २० व बाहेर गावातील २० अशी ४० मुले या निवासी शिबिरासाठी पाठवली .
                               मुले तर आली त्यांची राहण्याची सोय गावातील विठ्ठल मंदिरात झाली पण गावात पाण्याची गैरसोय होती यावर तोडगा म्हणून गावातील प्रत्येक मुलाने बाहेर गावच्या एका मुलाला अंघोळीसाठी व नाश्त्यासाठी आपल्या घरी नेण्याचे ठरले .
    हि ४० मुले दिवसभर या विठ्ठल मंदिरातच दिवसभर प्रशिक्षण घेतात या मध्ये दिवसाची सुरुवात योगासनांनी होते , कासारवाडीतील डॉक्टर पंडित खोत व त्यांची पत्नी दोघेही रोज सकाळी एक तास योगासने शिकवतात त्यानंतर एक तास पखवाज वादन व हरिपाठ पाठांतर होते नंतर मुलांना एका तासासाठी घरी अंघोळ व नाश्त्यासाठी सोडले जाते, पुढील दोन तासात भजन व अभंग पाठांतर होते दुपारी भोजन व विश्रांतीसाठी वेळ दिला जातो दुपारच्या सत्रात पख्वाजाला बोल देणे , ज्ञानेश्वरी ओव्या पाठांतर व पौराणिक कथा कथन होते सायंकाळी चहानंतर पुन्हा पखवाज सराव , अभंग सराव होतो यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे पाऊल खेळणे हा कार्यक्रम शिकवला जातो यात दिंडीच्या पुढे लयबद्धरीत्या टाळांच्या गजरात कसे वारकरी नृत्य करावे हे शिकवले जाते , सर्व मुले अक्षरशः बेभान होऊन नाचतात यानंतर रात्री पंचपदी शेजारती होऊन दिवसाची सांगता होते व रात्रीचे भोजनानंतर मुले झोपतात .
                          या उपक्रमासाठी कोणाकडूनही एक पैसाही घेतला नाही हे वैशिष्ट्य आहे पण तरीही ग्रांमस्थ स्वयंस्फूर्तीने भोजनावली घालतात , कोण मुलांना दूध देतो तर कोणी नाश्ता देतात ,मुलांची खायची अगदी चंगळ आहे अगदी पंचपक्वानपासून ते  या मोसमातील आम्रसापर्यंत सर्व पदार्थ मिळतात .
              
   हे सर्व करताना येथे कडक शिस्त मात्र जाणवते कोणाही मुलाला बाहेर जाण्याची परवानगी नाही तसेच कोणी आजारी पडले तर गावातील डॉक्टर विशाल पाटील हे मोफत औषधोपचार सेवा देतात .
           या शिबिरात मुलांना आई वडिलांना दैवत मानून त्यांची सेवा करणे ,समाजात आदर्श वागणे असे संस्कारही घडोघडी शिकवले जातात या शिबिराचे फलित एवढे आहे कि गावातील काही लोकांनी व्यसने सोडली कारण आपली मुले जर अध्यात्मात एव्हडी प्रगती करत असतील तर आपणही त्यांना सहकार्य करावे असे त्यांना वाटले , मुलांमुळे त्याचे पालकही टीव्ही सोडून मंदिरात येऊ लागले आहेत .
                 या सर्व शिबिरासाठी भिकाजी शिंदे ,भागवत शिंदे ,बाळासो खोत ,बजरंग खोत ,महादेव खोत ,वैभव खाडे , शरद जोंधळे हे २४ तास मंदिरातच मुलांसोबत असतात त्यांनी अक्षरशः हा महिना आपली नित्य कामे व जबाबदाऱ्या घरच्यांवर सोपवून स्वतःला वाहून घेतले आहे .
             या अतिशय सुंदर उपक्रमास हार्दिक शुभेच्छा !
या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी संपर्क - भागवत शिंदे  - 9049936511

No comments :

Post a Comment