Powered by Blogger.

Thursday, 4 May 2017

ऊस तोडणी मजुराचा मुलगा निघाला जपानला

No comments :

सचिंद्र जाधव याची जपान दौऱ्यासाठी निवड.

भोगावती/वार्ताहर

कौलव(ता.राधानगरी)येथील बाळासाहेब पाटील कौलवकर हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्थी सचिंद्र जाधव याची जपान अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील यावर्षीचा सचिंद्र जाधव हा एकमेव विद्यार्थी आहे.इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सचिंद्र जाधव याने राष्ट्रीय पातळीवर ब्रॉन्झ पदक मिळवल्याने त्याला हा बहुमान मिळाला आहे.शाळेतील विद्यार्थ्यांचा परदेश दौरा निमीत्त सचिंद्र जाधव याचा आर्य समाज शिक्षण संस्थेमार्फत सत्कार आणि रोख पारितोषिक देण्यात आले.
   राधानगरी तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनातील विशेष ठसा उमटवलेली शाळा म्हणून कौलव येथील बाळासाहेब पाटील कौलवकर हायस्कूल शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेतील विज्ञान उपकरणे तालुका,जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकली आहेत.यावर्षीच्या इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सचिंद्र मारुती जाधव याने शाळेतील विज्ञान शिक्षक आनंदराव चरापले ,कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपसिंह पाटील कौलवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेती मित्र हे विज्ञान उपकरण तयार केले होते.या उपकरणाला कोल्हापूर जिल्हा इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात यश मिळाले आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन अकोला येथे निवड झाली.राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट उपकरण म्हणून बहुमान मिळाला आणि सदर यंत्राची निवड राष्ट्रीय पातळीवरील इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन ,पुसा नवी दिल्ली येथे झाली होती.
  नवी दिल्ली येथे डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात बाळासाहेब पाटील कौलवकर हायस्कूल च्या सचिंद्र जाधव या विध्यार्थ्यांच्या शेती मित्र उपकरणाला तिसरा क्रमांक मिळाला.केंद्रीय विज्ञान मंत्री डॉ.हर्षवर्धन,संशोधक डॉ.विजय भटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ब्रॉन्झ पदक,प्रशस्तीपत्र आणि लॅपटॉप असे पारितोषिक मिळाले.याच बरोबर सचिंद्र जाधव याची जपान अभ्यास सहलीसाठी निवड झाली.
    सचिंद्र जाधव हा पिंपळवाडी गावातील भोगावती साखर कारखान्याकडे असलेल्या ऊस तोडणी मजुराचा मुलगा आहे त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे.त्याने मिळवलेले विज्ञानातील सुयश हे उल्लेखनीय आहे.महाराष्ट्र राज्यातून जपान दौऱ्यासाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून सचिंद्र जाधव हा कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव विध्यार्थी आहे. इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय पातळीवर गेल्या दहा वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त तीनच विध्यार्थी चमकले आहेत .नितीन पाटील(आरळे),यश आंबोळे(कोल्हापूर)सचिंद्र जाधव(कौलव).पिंपळवाडी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्याने विज्ञान प्रदर्शनातील यश कौतुकास्पद आहे .या यशाबद्दल सचिंद्र जाधव आणि बाळासाहेब पाटील कौलवकर हायस्कूलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.जपान अभ्यास दौरा सत्तावीस मे ते सहा जून पर्यंत असून जपान देशातील विज्ञानातील महत्वाच्या संस्थांना भेटी देणार आहेत.विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जपान दौरा होत आहे.यानिमित्य सचिंद्र जाधव याचा  कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपसिंह पाटील कौलवकर यांच्या हस्ते सत्कार आणि रोख पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस.वाय.पाटील आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.

फोटो - सचिंद्र जाधव याचा सत्कार करताना दिलीपसिंह पाटील कौलवकर,
एस.वाय.पाटीलआणि शाळेतील शिक्षक वर्ग.

No comments :

Post a Comment