Powered by Blogger.

Monday, 26 June 2017

शाहूंची वैचारिक प्रतिमा जपण्याची गरज - दलितमित्र दत्ता चौगले

No comments :

मुरगुड प्रतिनिधी
समीर कटके

       शाहूंची वैचारिक प्रतिमा जपण्याचे कार्य हाती घेण्याची गरज आहे. श्रद्धेच्या नावावर लहान कर्मकांडे करून थोर महापुरुषांच्या विचारधारा संपुष्टात आणण्याच्या षडयंत्रास लोक बळी पडत आहेत. कर्मकांडाना तिलांजली देऊन समता व चिकित्सेवर आधारित बुद्ध व वारकरी संतांचे विचार स्वीकारावेत असे प्रतिपादन दलितमित्र दत्ता चौगले यांनी केले.
          मुरगुड ता कागल येथे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव हरिभाऊ पाटील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने शाहू जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
     दत्ता चौगले आपल्या भाषणात म्हणाले, भारतातून बुद्धाचे विचार हद्दपार करण्यासाठी पुष्यशृंगमित्राच्या माध्यमातून प्रतिक्रांतीचे बीजे रोवण्यात आली. श्रद्धेपोटी भावनिक होत लोकांनी अनेक विधी स्वीकारले व कालांतराने माणूस श्रद्धेचा गुलाम बनला. लोकशाही व सार्वत्रिक शिक्षणातून धार्मिक गुलामगिरी व जातीव्यवस्थेतुन माणूस राजकीय व कायदेशीर दृष्ट्या मुक्त झाला पण त्याची मनोवृत्ती मात्र तशीच राहावी यासाठी कर्मकांडाचे स्तोम माजवले जात आहे.
         लहान सहान कर्मकांडे, धार्मिक विधीतुन चातुर्वण्याची मानसिकता दृढ करण्याचे प्रयत्न प्रतिक्रांतीचे पुरस्कर्ते करत असतात. विचार संपवता येत नसतील तर महापुरुषांना संपवणे किंवा त्यांचे दैवतीकरण करण्याची ही सूत्रबद्ध योजना आहे. या सूत्रबद्ध  षडयंत्रापासून सावध राहावे. अन्यथा बहुजन महापुरुषांचे दैवतीकरण होऊन त्यांचे विचार संपतील असे ते म्हणाले.
        वाचनालयाचे अविनाश पाटील यांनी  राजर्षी शाहूंच्या प्रतिमेस हार देऊन अभिवादन केले यावेळी व्ही आर भोसले, मोहन अनावकार, मारुती रावण, बाळकृष्ण कासार,सदाशिव सूर्यवंशी,  सदाशिव पाटील, रामचंद्र रणवरे, महेश कांबळे, सदाशिव यादव,सुखदेव चव्हाण, सुरेश रामाने, शंकर पाटील, संजय उपाध्ये, विश्वजित जाधव उपस्थित होते.यावेळी व्ही आर भोसले, समीर कटके, एम व्ही भोसले यांचे मनोगत झाले.स्वागत प्रास्ताविक बी एस खामकर यांनी केले. आभार धुवबाळ कुलकर्णी यांनी मानले.

     फोटो:  विठ्ठलराव पाटील वाचनालयात    शाहू जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन करताना अविनाश पाटील, दत्ता चौगले, बी एस खामकर.

No comments :

Post a Comment