Friday, 30 June 2017
मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्ड्यांमुळे ठरतोय जीवघेणा - एक्सक्लूसिव रिपोर्ट
निकेत पावसकर
मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग विशेषत: कणकवली पासून सावंतवाडीपर्यंतचा प्रवास हा अनेकांना जीवघेणा ठरला आहे. भलेमोठे खड्डे आणि त्यात पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे कितीही काळजीपूर्वक वाहन चालवूनही अनेकदा अपघाताची नामुष्की ओढवते. या खड्ड्यांकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता सिंधुदुर्गातील सजग नागरिकांनी खरे तर १ जुलैपासूनचे वृक्षारोपण या खड्ड्यांमध्येच करून प्रतीकात्मक निषेध नोंदवला पाहिजे, असा विचार पुढे येताना दिसतो.
गेल्या अनेक वर्षांची या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांची मागणी आहे कि, हा रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित केला पाहिजे. वाहतुकीस योग्य करा. दरवर्षी हा महामार्ग पहिल्याच पावसात पूर्णपणे बाद होऊन जातो. अनेक ठिकाणी धोकादायक वळनांमुळे तर बहुतेकदा हे खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात होत असल्याचे दिसून येते. गेल्या १० वर्षात २० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू या महामार्गावर झालेला आहे.
§ सजग नागरिकांनी जागरूक व्हावे §
जिल्ह्यातील सजग नागरिकांनी आतातरी जागरूक होऊन महामार्गाच्या दयनीय अवस्थेकडे गांभीर्याने पहिले पाहिजे. जिल्ह्यात सामाजिक काम करणार्या संघटना व कार्यकर्ते कमी नाहीत. त्या सर्वांनी एकत्र येऊन या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. सुस्त प्रशासन आणि निद्रिस्त लोकप्रतिनिधी यांना खणखणीत जाग आणली पाहिजे.
§ पावसाच्या तोंडावर कामाला सुरुवात §
जिल्ह्यातील रस्त्यांची कामे हि बहुतांशी पावसाच्या तोंडावरच सुरुवात केली जातात. यावर्षीही या राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी पच मारायचे काम अगदी जूनच्या मध्यावधी पर्यंत सुरूच होते. अनेकदा यामुळे कामाचे आयुष्य कमी होते. किंबहुना जिल्ह्यातील पावसामुळे अशी कामे त्याचवर्षी पुन्हा खड्डे पडून बाद होऊन जातात.
§ वृक्षारोपण करावे याच खड्ड्यात §
या महामार्गावर अनेक ठिकाणी भलेमोठे आणि ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. जिल्ह्यातील सजग नागरिकांनी याच खड्ड्यात खर्याअर्थाने शासनाच्याच १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड करण्याच्या कार्यक्रमानिमित्ताने वृक्षारोपण करून या प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचाही प्रतीकात्मक निषेध केला पाहिजे, अशाप्रकारची मागणी अनेकजण बोलून दाखवतात.
अलीकडेच या महामार्गाच्या चौपदरीकरण भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या अनेक लोकप्रतिनिधींसाठी या मार्गाचे तातडीने काम करण्यात आले. मात्र हे कामही इतके दर्जाहीन केले कि, मंत्री दौरा संपवून गेले आणि अवघ्या ८ ते १० दिवसातच पुन्हा महामार्ग जैसे थे बनला. जिल्ह्यातील हा मार्ग वळणांचा आणि चढ उतारांचा असल्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक ठिकाणे आहेत. तरीदेखील त्यावर कोणत्याही प्रकारचे बदल केला जात नाही.
§ आता प्रतीक्षा चौपदरीकरणाची §
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा चौपदरीकरणाचा बोलबाला होत होता. त्यातही गेल्या दोन वर्षांच्या प्रचंड संघर्षानंतर अखेर जून २०१७ मध्ये सर्व राजकीय पक्षांचे नाते एकत्र येत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे या मार्गाचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही आश्वासन मिळाले. त्यामुळे आता चौपदरीकरणाची प्रतीक्षा लागली आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला आलेल्या नेते मंडळींच्या प्रवासासाठी या मार्गावर पच मारण्यात आले. त्यासाठी निधी खर्च करण्यात आला. खर तर त्यावेळी संबंधित विभागाने या रस्त्याच्या कामासाठी निधी वापरूच नये. कारण एका दिवसासाठीच्या कार्यक्रमासाठी महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी खर्च घालू शकतात. तर खरे या मार्गाचे हक्कदार आहेत अशा प्रवाशी व वाहनचालकांना नेहमीच प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास का करावा लागतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यातही या मार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. सरासरी दररोज एक अपघात हा ठरलेलाच आहे. यामुळे वाहन चालक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. मात्र कोणत्याही प्रकाराचे गांभीर्य नसलेले प्रशासन आणि गाढ निद्रिस्त असलेला संबंधित विभागाला त्याचे काहीही नाही. त्यातही जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी अनेकदा राजकीय हेतूसाठी अशा प्रश्नांवर साधक बाधक काम करतात. अनेकदा ती शोबाजी असल्यामुळे त्या सर्व प्रकारामध्ये सर्वसामान्य प्रवाशी व वाहन चालक होरपळले जातात. यासाठीच जिल्ह्यातील राजकीय विचार बाजूला ठेऊन सजग नागरिकांनी एकत्र येत याबाबत निषेध नोंदवावा असा विचार जोर धरू लागला आहे.
या महामार्गावर दरवर्षी अपघातामुळे असंख्य बळी जातात. या बळी गेलेल्या प्रवाशांच्या आयुष्याचे मोल करता येणारं नाही. मात्र निश्चितच ते या महामार्गाच्या मूल्यापेक्षा जास्त होईल. त्यामुळे अजून किती जणांचे बळी घेणार आहात असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मार्गावरील काही पुलांवर अशी परिस्थिती आहे कि, पावसाचे पाणी या पुलावरच साठते. पुलावर मध्येच खड्डा आहे. पावसाच्या पाण्यामुळे नवीन वाहन चालकाला त्या खड्याची काहीच कल्पना नसताना अचानक खड्ड्यात गाडी आदळते. यामुळेही अपघात होण्याची संभावना असते.
या मार्गावर मे २०१७ च्या अखेरीस काहीठिकाणी पच मारण्याचे काम करण्यात आले. हे काम अगदी जूनच्या १० तारीखपर्यंत सुरु होते. वरून पावसाचे पाणी आणि खाली पॅच मारण्याचे काम सुरु असताना अशाप्रकाराचे काम किती काळ टिकू शकेल? ते सर्व केलेल्या कामावर पुन्हा महिन्याभराच्या आतच पुन्हा खड्डे पडले आणि महामार्ग पुन्हा जैसे थे झाला. अनेकदा हा महामार्ग आहे कि ग्रामीण भागातील रस्ता असाही प्रश्न पडतो. एवढी दयनीय अवस्था या मार्गाची झाली आहे.
फोटो : मुंबई गोवा महामार्गावरील ठिकठिकाणी असे भलेमोठे खड्डे पडले आहेत.
No comments :
Post a Comment