Powered by Blogger.

Sunday, 4 June 2017

आई रिटायर झाली तर घर संपते तर शेतकरी रिटायर झाला तर देश संपेल - प्रा.संजय मंडलिक

No comments :

मुरगुड प्रतिनिधी
समीर कटके

  शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नास प्राधान्य देण्याची मानसिकता या सरकारची नाही.आई रिटायर झाली तर घर संपते तर शेतकरी रिटायर झाला तर देश संपेल हे सरकारला समजत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.माध्यमांवर येऊन शेतकऱ्यांची थट्टा  करण्याचा एक कलमी कार्यक्रम काही बुद्धिवंतांनी   सुरु केला आहे.सरकारला शेतकऱ्यांचा सरसकट संपूर्णसातबारा कोरा करावाच लागेल असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष व शिवसेनेचे संपर्क प्रमुख  प्रा संजय मंडलिक यांनी केले.
      मुरगुड ता कागल येथे पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवसेनेच्या 'मी कर्जमुक्त होणारच'  अभियान  मेळाव्यात ते बोलत होते. माजी आम संजय घाटगे, विजय देवणे, नगराध्यक्ष राजेखान जमादार प्रमुख उपस्थिती होते.
         प्रा संजय मंडलिक शेतकरी संपात सर्व पक्षाचा शेतकरी गट तट विसरून सहभागी झाला आहे. झेंडे वेगवेगळे असले तरी संपूर्ण कर्जमाफी हेच एकमेव ध्येय आहे. शासनाच्या बेफिकिरीमुळेच आजपर्यंत सहनशील असणारा शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.  या देशात उद्योजक कधी मोर्चे काढताना दिसत नाही पण संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळी राजास मात्र आपल्या मुला बाळांसह रस्त्यावर यावे लागते हे भारतासारख्या कृषिप्रधान देशास अत्यंत लाजिरवाणे आहे. शिवसेना शेतकऱ्यांना न्याय्य हक्क मिळवून देण्यात यशस्वी होईल असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  गेल्या तीन वर्षात  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'आम्ही सकारात्मक आहोत' अशीच प्रतिक्रिया देतात भुकेने व्याकुळ असणाऱ्या व्यक्तीस 'आम्ही सकारात्मक आहोत दोन दिवसानंतर पाहू'  असे म्हणून कसे चालेल. शेतकरी आपला हक्क मागत आहे हे सरकारने विसरू नये, असेही ते  म्हणाले.
          माजी आमदार संजय घाटगे म्हणाले कोणताही राजकीय पाठिंबा नसताना संपूर्ण राज्यभर शेतकरी संपावर गेला त्याची कारणे सरकारने शोधली पाहिजेत. सरकारने पूर्वग्रहदूषित असून चालत नाही.शासन जेवढा निधी शेतीवर खर्च करते त्याहून अधिक निधी शेतकरी कर रूपाने सरकारी तिजोरीत भरतात, याची जाणीव पूर्वीच्या सरकारला होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शेती विषयी सकारात्मक निर्णय घेतले. वीज दराबाबत त्यांनी घेतलेला निर्णय आदर्श असल्याचे सांगितले. सध्या मात्र शासन विमानतळ, महामार्ग या बाबतच विचार करते. शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थैर्य नाही, शांतता नाही, कारण त्याच्या श्रमाने उत्पादित होणाऱ्या मालाला हमीभाव नाही. जगभरात शेतीसाठी श्रम करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत आहे पण भारतात या बाबत परिस्थिती समाधानकारक आहे. याचे भान ठेवून शासनातील लोकांनी संवेदनशीलता दाखवावी.
           विजय देवणे म्हणाले देशाचा पोशिंदा असणारा राज्यातील शेतकरी हतबल संपावर जातो ही गोष्ट पुरोगामी व शेतीप्रधान महाराष्ट्रास गौरवाची नाही उलट तो काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना संप करावा लागतो हे दुर्दैव आहे.स्वातंत्र्यापासून हा देश भांडवलदारांच्या हातात राहिला आहे.  शेतकऱ्याला आपली भांडण शेती जिवंत ठेवायची आहे पण शासन शेती भांडवलदारांच्या घशात घालावी  अशीच धोरणे राबवत आहे. दडपशाहीच्या माध्यमातून मुख्यमंत्री आंदोलन मोडत आहेत असा आरोप त्यांनी केला. 'मी कर्जमुक्त होणारच' अभियानात प्रत्येक तालुक्यातून पन्नास हजार अर्ज भरून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचे ध्येय पूर्ण करणार असल्याचे त्यानी सांगितले. एस आर बाईत यांचे भाषण झाले.
         स्वागत नगराध्यक्ष राजेखान जमादार , प्रास्ताविक संभाजी भोकरे यांनी केले. उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, आर डी पाटील, नामदेवराव मेंडके, धनाजी गोधडे, शिवगोंडा पाटील, अशोक पाटील, मारुती गिरीबुवा, विद्या गिरी यांच्यासह नगरसेवक, सदा साखरचे संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  ~घाटगे यांची जीभ घसरली~
      भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी ' शेतकऱ्यांच्या संपामुळे काही फरक पडत नाही गरज पडल्यास अन्नधान्य आयात करू' असे वक्तव्य केले होते यावर जोरदार टीका करणाऱ्या संजय घाटगे यांची जीभ घसरली.

    प्रा मंडलिक म्हणाले  'भाजप शासनास शेतकऱ्यांच्या मतांची किंमत नाही सरकार शहरी नागरिकांसाठी काम करते. शहरी भागातील लोकांच्या मतावर भाजप सत्तेत आहे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे हे शासन शेतकऱ्यांना न्याय देईल याबाबत शंका व्यक्त केली.

फोटो  :मुरगुड ता कागल येथील शिवसेनेच्या 'मी कर्जमुक्त होणारच ' अभियान व शेतकरी मेळाव्यात बोलताना प्रा संजय मंडलिक, शेजारी संजय घाटगे, विजय देवणे, राजेखान जमादार
      (छाया उदय हासबे मुरगुड)

No comments :

Post a Comment